महाराष्ट्रात मस्साजोगची पुनरावृत्ती, युवकाचं अपहरण करत भरदिवसा डोंगरात जाळलं, पोलिसांनी नऊ जणांना केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करीत खून केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना अहिल्यानगर शहरात अशीच एक घटना घडली आहे. जुन्या भांडणातून एका युवकाचे भर दुपारी अपहरण करण्यात आले. त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कारमधून डोंगरात जाळून तेथील हाडे आणि राखही फेकून देऊन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे. गेल्या शनिवारी नगरमधून अपहरण करण्यात आलेल्याची घटना उघडकीस आली सुरवातीला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (१९) याचे २२ फेब्रुवारीला अपहरण झाले होते. सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी (२३), सुमित बाळासाहेब थोरात (२४), महेश मारोतीराव पाटील (२६) आणि नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (२५) या आरोपींना अटक केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, आम्ही आरोपीचे अपहण केले, मात्र तो आमच्या ताब्यातू पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा शोधाशोध सुरू केली. संपूर्ण परिसर पोलिसांना पिंजून काढला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून विशाल दिपक कापरे (२२), विकास अशोक गव्हाणे (२३), करण सुंदर शिंद (२४), रोहित बापुसाहेब गोसावी (२०) व स्वप्नील रमाकांत पाटील (२३) यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेची माहिती दिली. यातील युवक वैभव नायकोडी २२ फेब्रुवारीला दुपारी केस कापण्यासाठी घराजळील सलूनमध्ये गेला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही, म्हणून त्याची आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली. जुन्या भांडणातून त्याचे अपहरण झाल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. पाच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. मागील भांडणाचे कारणावरून या आरोपींनी वैभव नायकोडी याला २२ फेब्रुवारीला तपोवन रोड, अहिल्यानगर येथून कारमधून एमआयडीसी परिसरातील मोकळया जागेत आणि तेथीलच एका अपार्टमेंट नेऊन सर्वानी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर २३ फेब्रुवारीला दुपारच्यावेळी आरोपींनी वैभवचा मृतदेह कारमधून शहरापासून जवळच असलेल्या विळद घाटाजवळील केकताईच्या डोंगरात नेला. तेथे लाकडे आणि डिझेल टाकून मृतदेह जाळला. मागे काहीच पुरावा राहू नये यासाठी तेथील हाडे व राख यांचीही आरोपींनी विल्हेवाट लावली.