शिवसैनिकांसाठी मंदिर असलेल्या शिंदे शिवसेना शाखेत दारूपार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून सुनिल प्रभू यांनी टीका केली आहे. शिवसैनिकांसाठी शाखा हे मंदिर आहे. अशा मंदिरात हे दारू पार्टी करतात. यानिमित्ताने त्यांचा बुरखा फाटल्याची टीका त्यांनी केली. मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. गंभीर बाब म्हणजे दारूपार्टीच्या ठिकाणी मागे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटो आहेत.. त्यासमोरच दारुपार्टी रंगल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
या पार्टीत शाखाप्रमुख दिपक चौहान, उपविभागप्रुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारीही सहभागी असल्याचं दिसतंय. टेबलवर दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लासही पाहायला मिळत आहे.मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारे जर घटना घडली असेल तर ती दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलीय. दारुपार्टीच्या या व्हिडिओवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातात आयता मुद्दा मिळाला. त्यामुळे आगामी काळात यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगणार यात शंका नाही.