अबब ! महिलेने पोटात लपविले ११ कोटींचे कोकेन; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबईतील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अंमली पदार्थ विरोधातील मोठी कारवाई करण्यात आली. यात ब्राझीलवरून आलेल्या एका विदेशी महिलेला तब्बल ११ कोटींच्या कोकेनसह अटक करण्यात आली आहे. महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ब्राझिलियन महिलेची अटक केली आहे. यात ही महिला सुमारे ११ कोटी रुपये किमतीचा कोकेन भारतात तस्करी करून आणण्याचा प्रयत्न करत होती. या कारवाईत कोकेन असलेल्या सुमारे १०० कॅप्सूल तिच्या पोटातून काढण्यात आल्याचे डीआरआयकडून सांगण्यात आले आहे. परिणामी पोलिसांना या गुप्त तस्करीचा भांडाफोड करण्यात यश आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मुंबईला आली होती. तपासादरम्यान, जेव्हा तिला या अमली पदार्थांबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा तिने अमली पदार्थ असलेले कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. यानंतर तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिने गिळलेल्या १०० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. यात एकूण १०६६ ग्रॅम कोकेन होते. त्याची किंमत १० कोटी ९६ लाख रुपये आहे, असे डीआरआयने सांगितले. दरम्यान, कोकेनचा साठा अधिक असल्यामुळे तिच्याविरोधात दाखल गुन्हा सिद्ध झाल्यास महिलेला २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देऊ शकते अशी माहिती तपास अधिकारयांनी दिली आहे.