माधबी पुरी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सेबीच्या माजी प्रमुखासह ५ अधिकारी अडचणीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सेबी च्या माजी अध्यक्ष माधबी पुरी बुच आणि पाच अधिकाऱ्यांविरोधात स्टॉक मार्केट घोटाळा आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या प्रकरणात नियामक त्रुटी आणि संगनमताचे स्पष्ट पुरावे आढळल्याचे नमूद केले आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्याचे सांगितले. एका पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीत, शेअर बाजारात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. सेबी अधिकाऱ्यांवर नियामक उल्लंघन, भ्रष्टाचार, आणि स्टॉक एक्स्चेंजमध्ये अपात्र कंपनीची फसवणूक करून लिस्टिंग घडवून आणल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सेबी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन केले नाही आणि बाजारात गैरव्यवहार घडू दिले.
तक्रारदाराने यापूर्वी कायदा अंमलबजावणी संस्थांना आणि नियामक संस्थांना तक्रारी दिल्या होत्या. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असेही सांगितले. त्यामुळे न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी विभागाला भादवि, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सेबी कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, या प्रकरणावर न्यायालय देखरेख ठेवणार असून ३० दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाचे हे आदेश म्हणजे भारतीय शेअर बाजारातील नियामक यंत्रणांवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरणार आहे.