पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शन?

Spread the love

पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शन?

राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर फोटो; अजित पवारांचे आमदार म्हणाले, माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नाही, राजकीय हितसंबंधांची पोलिसांकडून चौकशी सुरू

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा आहे. तो मुळचा शिरूरचा राहणारा असल्याने शिरूरच्या आजी-माजी आमदारांबरोबर त्याचे फोटो असल्याचे समोर आले आहे. शिरूरचे आजी माजी आमदार अनुक्रमे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. पण माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया शिरूरचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली आहे. पुण्यात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट एसटी स्थानकावरील शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला. या प्रकरणी दत्तात्रय गाडे या आरोपीची ओळख पटली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. तसंच, त्याचे अनेक राजकीय पक्षातील नेत्यांबरोबर संबंध असल्याची चर्चा आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर दत्तात्रय गाडे याचा फोटो आहे. अशोक पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील आहेत. तर, शिरूरचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याबरोबरही दत्तात्रय गाडेचा फोटो असून तो त्याने त्याच्या डीपीला लावला असल्याचं म्हटलं जातंय. याप्रकरणी ज्ञानेश्वर कटकेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

दत्तात्रय गाडेशी संबंध असल्याच्या दाव्यावर आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, “आरोपी शिरूर तालुक्यात राहणारा आहे. तो मतदारसंघ माझा असल्याने अनेकजण येतात आणि माझ्याबरोबर फोटो काढतात. पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. दिवसभरात असे अनेकजण भेटत असतात, फोटो काढत असतात. पण मी दत्तात्रय गाडेला ओळखत नाही. विकृत असलेल्या अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.” माजी आमदार अशोक पवार काय म्हणाले हा आरोपी उज्जैन यात्रेला कोणाला मदत करत होता, कोणत्या महिला-भगिनींना नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. याचे हितसंबंध कोणा-कोणाशी होते, हे ताबडतोब शोधलं पाहिजे. याचा मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जेनला गेला त्याचे रेकॉर्ड मागा. अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार अशोक पवार म्हणाले. दरम्यान, या राजकीय हितसंबंधांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon