भिवंडीत २२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भिवंडी – भिवंडीमध्ये एका २२ वर्षीय महिलेवर ६ आरोपींनी मिळून अमानुष प्रकार केला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.सदर घटना भिवंडीतील असून, पीडितेला आरोपींनी पकडून पिकअप व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवले. नंतर त्यांनी तिला एका शाळेजवळ निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केले. अत्याचारानंतर पीडित महिलेने मदतीसाठी आपल्या भावाला फोन केला. महिलेच्या भावासोबत एक ऑटोचालक आणि अजून एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने घटनास्थळावरून पळवून लावले. आरोपींनी कोणालाही मदतीसाठी थांबू दिले नाही, त्यामुळे पीडितेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.
प्रचंड धैर्य एकवटून पीडित महिला भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र पुढील तपासासाठी ही केस शांतिनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली. सध्या सर्व आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, आरोपी लवकरच गजाआड केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिस प्रशासनाने त्वरीत कारवाई करत आरोपींना अटक करावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.