एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून ताब्यात

Spread the love

एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॅाम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली होती. हैराण करणारे म्हणजे मुंबईतल्या जवळपास ३ ते ४ पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल आला होता. आता मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने बुलढाणा येथून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी जे. जे मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे आणि मंत्रालय या ठिकाणी इमेल करून धमकी दिली होती. अभय शिंगणे (२२) आणि मंगेश वायाळ (३५) अशी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॅाम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अभय शिंगणे हा टेक्निशियन आहे तर मंगेश हा चालक आहे. दोघांनी मिळूनच धमक्या दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेतले आणि आता त्यांची चाैकशी केली जात आहे.

या दोघांनी धमकी नेमकी का दिली आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास केला जात होता आणि आता बुलढाण्यातून पोलिसांनी दोघांना अटक केले. गेल्या काही दिवसांपासून सतत धमकीचे फोन आणि ईमेल येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालीये. एकनाथ शिंदे यांच्या नावाने ज्यावेळी धमकी देण्यात आली, त्यावेळी ते दिल्लीला होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॅाम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने काही काळ खळबळ उडाली होती. सतत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केले की, मी नाराज नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon