अक्षय कुमारच्या शिवलिंगासोबतच्या ‘त्या’ दृश्यावर आक्षेप; ‘महाकाल चलो’ गाण्यावरून वाद
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे. अशातच अभिनेता अक्षय कुमार याने महादेवाच्या भक्तांसाठी महाकाल चलो हे गाणं लाँच केलं. काही वेळातच हे गाणे व्हायरल झाल खरं पण दुसरीकडे या गाण्यातील शिवलिंगासोबतच्या ‘त्या’ दृश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. उज्जैन ही धार्मिक नगरी म्हणून महादेवाचा वास्तव्यने ओळखली जाते. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान महाकालची इथे राजा म्हणून पूजा करण्यात येते. इथे दररोज लाखो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. हे मंदिर चित्रपट कलाकारांनाही खूप आकर्षित करत असतं. महाशिवरात्रीनिमित्त, अभिनेता अक्षय कुमारने गायक पलाश सेनसोबत एका भक्तिगीतात सहभाग घेतला. मंगळवारी निर्मात्यांनी ‘महाकाल चलो’ हे गाणे रिलीज केले. गाण्याच्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारच्या त्या कृत्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय. महाकाल पुरोहित संघाने या गाण्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केलाय.
महाकाल मंदिराचे पुजारी महेश शर्मा यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, ‘महाकाल चलो’ या गाण्यात जगप्रसिद्ध बाबा महाकालचे अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या गाण्याच्या वेळी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. अभिषेक करताना, शिवलिंगाभोवती गुंडाळलेल्या व्यक्तीवर पंचामृत देखील अर्पण करण्यात येतं आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे, त्यांचं मत आहे. बाबा महाकाल यांचे जगप्रसिद्ध शिवलिंग हे एकमेव शिवलिंग आहे ज्यावर राख अर्पण करण्यात येते. याशिवाय, इतर कुठेही भगवान शिवाला राख अर्पण करण्यात येत नाही. मात्र, हे गाणे बनवताना, कोणत्याही स्टुडिओमध्ये भगवान शिवाचे शिवलिंग बनवून त्यावर राख अर्पण करणे आणि स्वतःवरही राख अर्पण करण्याचे दृश्य दाखवणे अयोग्य असल्याच त्यांनी म्हटलंय. १८ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या “महाकाल चलो” या गाण्यात अक्षय कुमार महाकालाच्या भक्तीत मग्न असल्याच दिसून आले आहे. गाण्याच्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार शिवलिंग धरलेला दिसतो आणि महादेवाच्या भक्तीत मग्न दाखवण्यात आलाय. अक्षयने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “ओम नमः शिवाय! महाकालाची शक्ती आणि भक्ती अनुभवा. यानंतर हे गाणे रिलीज करण्यात आलंय. एक दिवस आधी, अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की, “माझ्याकडून महादेवाला एक छोटीशी श्रद्धांजली, महाकाल चलो उद्या प्रदर्शित होत आहे”. ‘महाकाल चलो’ चा म्युझिक व्हिडीओ ३ मिनिटे १४ सेकंदांचा आहे. अक्षयचे हे गाणे पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने शिवभक्त या गाण्याचे कौतुक करताना दिसत आहेत. पण, उज्जैनमध्ये या गाण्यावरून एक वाद निर्माण झाला.