माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; २४ तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
योगेश पांडे / वर्ताहर
नागपूर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. हर्षवर्धन पाटील हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे त्यांची पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव सोमवारी नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर सोपस्कार पार करत त्यांना रीतसर अटक करुन तुरुंगात पाठवण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना पुढील २४ तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी २४ तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २०२४ मध्ये नागपूर दौऱ्यावर आले असता, एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. मात्र, त्यावेळी, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नकार दिल्यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता. या घटनेत त्यांच्यावर ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच गुन्ह्यात आज त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव यांना यापूर्वी देखील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाच जानेवारी २०११ रोजी वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. त्यावेळी, त्यांना भेटण्याच्या आग्रहावरुन पोलिस व आ. जाधव यांच्यात झटापट झाली. जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून दहा मार्च २०११ रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरले. सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी, औरंगाबाद खंडपीठाने जाधव यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला होता.