एम.बी.बी.एस. प्रवेशाच्या नावाने लाखोंची फसवणूक, कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – राज्यात फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच एक घटना घडली आहे.-कल्याण पश्चिमेतील खडकपाडा गंधारनगर भागातील दोन व्यक्तीनी एम. बी. बी. एस. प्रवेशाच्या नावाखाली एका महिलेची पाच लाख १० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फसवणूक झालेली पिडीत महिला या कल्याणमधील गोकुळनगरी गंधारनगर भागातच राहतात. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. दोन संशयितांविरोधात तक्रारदार महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा आणि बदनामी केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की, माझ्या मुलाला अहिल्यानगर
येथील विखे पाटील महाविद्यालयात एम. बी. बी. एस. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा होता. हा प्रवेश करून देण्याचे आमिष एक व्यक्ती आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दाखविले. या प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधितांनी आपल्याकडून रोख आणि ऑनलाईन माध्यमातून पाच लाख ५० हजार रूपये स्वीकारले. आपल्या मुलाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे मला भासविण्यात आले. प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आपण आपले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. या रकमेतील संबंधितांनी आपणास ४० हजार रूपये परत केले. उर्वरित रक्कम परत केली नाही. उर्वरित रक्कम परत मागण्याचा तगादा लावूनही ती रक्कम अद्याप परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक संबंधितांनी केली. सतत पैसे परत मागण्याचा तगादा लावला, आपली बदनामी केली तर आपणास जीवे ठार मारण्याची धमकी संबंधितांनी दिली आहे. त्यामुळे आपण दोन्ही इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार करत आहोत, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाची तक्रार दाखल होताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या आदेशावरून संबंधितांंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड याप्रकरणाचा तपास करत आहेत.