बांद्रा परिसरात मध्यरात्री बेकायदेशीर बाईक रेसिंग; ५२ दुचाकी जप्त
मुंबई – बांद्रा, खेरवाडी परिसरात पहाटेच्या सुमारास बांद्रा रिक्लेमेशन, माउंट मेरी रोड आणि बांद्रा पश्चिम द्रुतगती मार्गावर बेकायदेशीर मोटारसायकल रेसिंग सुरू असल्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. याची तातडीने दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या. बांद्रा पोलीस ठाण्याने १४ तर खेरवाडी पोलीस ठाण्याने ३८ अशा एकूण ५२ मोटारसायकली जप्त केल्या. याप्रकरणी बांद्रा पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खेरवाडी पोलीस ठाण्यात ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा बेकायदेशीर रेसिंगबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ १००, ११२ किंवा ०२२-२२६४१७५२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.