अंबरनाथ, उल्हासनगर व डायघरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक व ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ७ आरोपी अटकेत, २.६० कोटींचा मुद्देमाल जप्त
ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ७ आरोपींना अटक केली असून, सुमारे २ कोटी ६० लाख ३ हजार १०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. यामध्ये शीळ डायघरमधून एम.डी.जप्त करून ३ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी रोजी शिळ डायघर, ठाणे येथे छापा टाकून २,२५,४५,५००/- रुपये किमतीच्या ११०९.१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) सहित तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात राजस्थान आणि ठाण्यातील आरोपींचा समावेश आहे. प्राथमिक तपासात या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे तसेच अंबरनाथमध्ये गांजाची मोठी तस्करी उघड झाली असून यातून २ आरोपी अटकेत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ, भोईरनगर येथे केलेल्या कारवाईत ४४ किलो ८५५ ग्रॅम गांजा (किंमत २२,८५,१००/- रुपये) जप्त करण्यात आला व दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गांजाची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे तर उल्हासनगरमध्ये सुद्धा एम.डी. जप्त करून आरोपीना अटक केली आहे. १० फेब्रुवारी रोजी उल्हासनगर येथे छापा टाकून ५८.१ ग्रॅम एम.डी. (किंमत ११,७२,५००/- रुपये) जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ११३७.२ ग्रॅम एम.डी. आणि ४४ किलो ८५५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, अंमली पदार्थांच्या तस्करीत आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या सूचना प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने मोठी भूमिका बजावली. अंमली पदार्थ विक्री, वाहतूक, साठवणूक आणि सेवन हा गुन्हा आहे. जर अशा कोणत्याही गैरकृत्याची माहिती असेल, तर अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे (फोन: ०२२-२५३९६६८७) येथे संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.