परभणीत कोट्यवधीचा भिसी घोटाळा, सतीष नाईक’ नावाचा ‘परभणीचा कथित विजय मल्ल्या’ फरार
राजकीय नेत्यांशी घनिष्ठ मैत्री असल्याने, पुरावा नसल्याचा कांगावा करीत आरोपीविरुद्ध तक्रार गुदरण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार !
अशाच एका चिटफंड फसवणूक प्रकरणी गुजरात पोलीस कारवाई करु शकतात, तर मग परभणी पोलीसांकडून तक्रारीस नकार का ? नागरिकांमध्ये तीव्र संताप !
कथित आरोपीचे राजकारण्यांशी परभणी पोलीस संशयाच्या गर्तेत !
परभणी / दत्तात्रय कराळे
परभणी – भिसी व्यवसायात अग्रेसर व परभणीतील एका नामवंत राजकीय पुढाऱ्याशी घनिष्ठ (मैत्री) ओळख असलेल्या एका कथित विजय मल्ल्याने सुमारे ७०० ते ८०० गुंतवणूकदारांची रुपये ५० कोटींपेक्षा अधिकची आर्थिक फसवणूक करुन पोबारा केलेल्या आरोपीविरोधात शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे. सदर आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी काही गुंतवणूकदार गेले असता सदर आरोपीचे एका नामवंत राजकीय नेत्याबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचा कांगावा करीत नानलपेठ, नवा मोंढा पोलिसांनी तुमच्याकडे पुरावा नसल्याचे कारण देत चक्क तक्रार गुदरण्यास स्पष्ट नकार दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. एका बाजूला कोट्यवधींची फसवणूक तर दुसरीकडे कागदोपत्री पुरावा नसल्याने पोलिसांकडून दाखवला जाणारा कायद्याचा ससेमीरा, या दुहेरी कात्रीत सापडलेले गुंतवणूकदार पुरते हतबल झाले आहेत. परिणामी कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या अशा अडेल नीतीचा शेकडो गुंतवणूकदारांनी कमालीचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, गुजरात मध्ये अशाच एका चिटफंड घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांची झालेल्या घोर फसवणूक प्रकरणी नागरिकांमधली संतापजनक आक्रमकता ध्यानी घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहेच, त्याशिवाय पुढील चौकशीचे आदेशही सीआयडीकडे दिले आहेत. मग परभणी पोलीसांचा हा रवैय्या का आणि कशासाठी असू शकतो, हा खरा सवाल आहे. पोलीस, कायदा व अंमल या शासनस्तरावरील सर्व बाबी देशपातळीवर सर्वत्र सारख्याच अपेक्षित असतांना त्याला परभणीच अपवाद का ठरली जावी ? पोलिसांनी याप्रकरणी कथित आरोपीची पाठराखण केल्याचे दिसून येत नाही का ? या व अशा नानाविध शंका-कुशंकांमुळे परभणी शहर व जिल्हा पोलीस संशयाच्या गर्तेत सापडले गेल्यास आश्चर्य वाटू नये.
परभणी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या क्रांती चौक परिसरात सतीष नाईक नावाचा एक प्रतिष्ठित इसम बोली भिसी चालवत असे. सुमारे ७०० ते ८०० गुंतवणूकदाराकडून प्रती बोली एक लाख ते पाच लाखांची रोकड हा इसम वसूल करीत असे. सदरची रक्कम घेतांना व बोलीनंतर सदर रकमेपोटी आलेले कमिशन व वजा अदा करणे असलेल्या आकडेवारीचा गोषवारा हाच सतीष नाईक नावाचा इसम प्रत्येक सभासदांकडे असलेल्या डायरीत तो नोंद करुन देत असे, असेही समजते. एका बाजूला प्रती भिसी नियमित मिळणारा मोठ्या रकमेतील लाभ आणि दुसऱ्या बाजूला शहरातील एका नामवंत राजकीय नेत्याशी असलेली घनिष्ठता, या दोन्ही बाबी विश्वासार्हता संपादन करणाऱ्या वाटू लागल्या. त्याचीच परिणीती म्हणून हळूहळू हजारो नागरिकांची मने जिंकलेल्या याच सतीष नाईकने प्रारंभी एक लाखापासून सुरु केलेली भिसी नंतर पाच लाखांपर्यंत नेऊन हळूहळू आपले इक्षिप्त साध्य होताच शेवटी जे करायचे तेच केले. सुमारे तीस कोटींच्या रकमेचा गाशा गुंडाळून याच सतीष नाईकने एके दिवशी रातोरात पोबारा केला आहे. जातांना कोणताही पुरावा राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत त्याने पोबारा करण्या अगोदर त्याने कोणालाही थांगपत्ता न लागू देता आपल्या परिवाराला गनिमी कावा पध्दतीने अगोदरच अन्यत्र हलविले. मिळालेल्या विश्वसनीय सुत्रांनुसार सतीष नाईकने चुना लावलेल्या या रकमेचा आकडा ५० कोटींपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात आहे. गोर गरीब, मध्यमवर्गीय, फेरीवाले, दुकानदार, समाजसेवक, राजकारणी मंडळी, निरनिराळे व्यावसायिक, नोकरदार आदींनी या भिसीमध्ये रकमा गुंतवल्याचे समजते. एकूणच काय तर परभणीचा हा कथित विजय मल्ल्या म्हणजेच सतीष नाईक याने राजकीय ओळखीचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना मात्र चक्क कोट्यवधी रुपयांना गंडवून सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे एवढे नक्की..!
शुभमन गिलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये झालेल्या एका मोठ्या चिटफंड घोटाळ्यात गिलसह चार क्रिकेटपटूंची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी गुजरात सीआयडी लवकरच गिलसह चार क्रिकेटपटूना समन्स पाठवू शकते. गुजरात सीआयडी क्राइम ब्रांचकडून ४५० कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास सुरू आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार सीआयडी शुभमन गिलसह आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या अन्य खेळाडू साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा यांना समन्स पाठवू शकते.