वांद्रे येथे वृद्ध महिलेचा खून; आरोपीला अवघ्या २ तासांत बेड्या
मुंबई – वांद्रे पश्चिम येथील कांचन को-ऑप हाउसिंग सोसायटीत घरफोडीच्या उद्देशाने घुसलेल्या अज्ञात इसमाने ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून केला. वांद्रे पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली. दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:३० ते १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. जबरी चोरीसाठी घरी घुसलेल्या अज्ञात इसमाने महिलेच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या चौकशीनंतर संशयित शारीफ अली समशेर अली शेख (वय २७) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहायक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि विजय आचरेकर, सपोनि बजरंग जगताप तसेच सांताक्रूझ व आंबोली पोलिसांच्या पथकाने आरोपीला शोधून ताब्यात घेतले. या जलद कारवाईमुळे मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे. आरोपीवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.