ठाणे शहरात ५० घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद

Spread the love

ठाणे शहरात ५० घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद

ठाणे – ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कल्याण गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ५० घरफोडी प्रकरणांमध्ये वांछित असलेल्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. लक्ष्मण सुरेश शिवशरण (वय ४७) असे या आरोपीचे नाव असून, त्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात चोऱ्या केलेल्या आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताची ओळख पटवून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला भिवंडी येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ५० घरफोड्यांची कबुली देत चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी सुकेश मुददणा कोटीयन (वय ५५) याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी कोटीयनलाही अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५३.४१ लाख रुपये किमतीचे ६६७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७८,९०० रुपये रोख असा एकूण ५४.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक आरोपी लक्ष्मण शिवशरण याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी परिसरात ५० घरफोड्या केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान सुकेश मुददणा कोटीयन याला चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरुद्ध यापूर्वीही २००४ पासून ३० हून अधिक गुन्हे दाखल.

पोलीस दलाचे यशस्वी ऑपरेशन

ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहा. पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. कल्याण गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठी भूमिका बजावली. यामध्ये सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि विनोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या कारवाईमुळे ठाणे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडींच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon