वसई-विरारसह पालघर जिल्हा ‘एम.डी.ड्रग्ज’ च्या विळख्यात; रुपये २.४२ कोटींचा साठा जप्त; एक आरोपी अटकेत
दत्तात्रय कराळे
वसई-विरार या शहरी भागासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागही (एम.डी.ड्रग्ज) अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. आज पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रुपये २.४२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अमली पदार्थाचा धंदा आता विळखा आता ग्रामीण भागालाही पडू लागला आहे. वसई व नालासोपारा शहरात अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केल्याच्या असंख्य घटना घडल्या असल्याचे सर्वश्रुत आहे. हेच लोण आता जिल्हा स्थान असलेले पालघर व बोईसर भागातही मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे.
आज बोईसर पोलिसांनी कातकर पाडा परिसरात छापा टाकून केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल २ कोटी ४२ लाख रु.चे एम.डी.ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एका आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आपल्या राहत्या घरातच तो एम.डी.ड्रग्ज तयार करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांच्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी हा केमिस्ट्रीमध्ये एम.एस्. सी.पदवीधर असून, त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे या घातक पदार्थाची निर्मिती आपल्या राहत्या घरातूनच सुरू केली आहे. बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून एम.डी.ड्रग्जसह इतरही किंमती साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी टाकलेले हे धाडसत्र आणि शिताफीच्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.