लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणी ऑनलाईन फसवणुक उघडकीस; आरोपी अटकेत

Spread the love

लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणी ऑनलाईन फसवणुक उघडकीस; आरोपी अटकेत

मुंबई – मुंबईतील बडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने ऑनलाईन फसवणुकीचा पर्दाफाश करत २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे. फिर्यादीला लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेण्यासाठी इन्स्टाग्रामवरील ब्लिसफायस्टेज नावाचा प्रोफाइल आणि वेबसाईटद्वारे गंडा घालण्यात आला होता.

१६,००० रुपयांची फसवणूक

फिर्यादीने व्हिला बुक करण्यासाठी संपर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडून ऍडव्हान्स आणि डिपॉझिट म्हणून १६,००० रुपये ट्रान्सफर करून घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने फिर्यादीचा नंबर ब्लॉक केला, त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

सायबर पोलिसांची तांत्रिक तपासणी; आरोपी गजाआड

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी अल्तमस अहमदअली शेख (वय २१, रा. मानखुर्द, मुंबई) याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर ६ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले ३ मोबाईल आणि ४ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत, या मोबाईल क्रमांकांच्या आधारे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी १० तक्रारी दाखल असल्याचे उघड झाले आहे.

पोलीस कोठडी मंजूर

अटक आरोपीला शिवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी रागसुधा आर, एसीपी शैलेश चिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश जाधव आणि सायबर पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon