नागपुरात दोन भावांनी वाद मिटवण्यासाठी बोलावून भरदिवसा तरुणाला संपवलं; दोन्ही भावांना पोलीसांकडून बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
नागपूर – नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कावरा पेठ परिसरात दोन भावांनी मिळून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या केली. भरदिवसा झालेल्या या हत्येनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली होती. या हत्येत सहभागी असलेल्या दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे. हत्येची ही घटना शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावरा पेठ येथील वन बार अँड रेस्टॉरंटसमोर घडली. शुभम हरणे (२७) असे मृतकाचे नाव आहे. तर प्रयाग आसोले आणि त्याचा भाऊ अक्षय उर्फ लाखा आसोले अशी आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत आरोपी शुभमने अक्षय उर्फ लाखा याला झापड मारली होती. शुभम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून काही दिवसांपासून तो आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत होता. प्रयाग आणि अक्षय या दोन भावांवरही गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपीने शुभमला भेटायला बोलावले होते.
मृतक शुभम हा मयतीचे सामान विकण्याचे काम करतो. तो रविवारी दुपारी दुकान बंद करून आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी शुभमसोबत त्याचे इतर दोन मित्रही होते. दरम्यान, बोलत असताना आरोपींनी शुभमवर मागून कटर सारख्या शस्त्राने हल्ला केल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. नंतर शुभमच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मेओ हॉस्पिटलमध्ये नेले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी शुभमला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. ज्या ठिकाणी ही हत्येची घटना घडली त्या ठिकाणी सुरू असलेल्या बार आणि रेस्टॉरंटबाबत नागरिकांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. अनेकदा दारूच्या नशेत येथे गुन्हेगारांचा जमाव असतो, त्यामुळे नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो. रहिवासी भागात सुरू असलेल्या या बार बाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.