ठाण्याच्या पाईपलाईनजवळ कॅब ड्रायव्हरचा मृतदेह सापडल्याने खळबळ, २० वर्षीय महिलेला अटक
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – ठाणे पोलिसांनी एका कॅब चालकाच्या हत्ये प्रकरणी २० वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. मृत्यू झालेला २२ वर्षांचा अक्रम इकबाल कुरेशी मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहत होता. १७ जानेवारीला अक्रम घरातून कॅब घेऊन निघाला, पण त्यानंतर तो गायब झाला. दुसऱ्या दिवशी अक्रमचा मृतदेह तानसा-वैतरणा पाईपलाईनजवळ आढळला होता. अक्रमच्या डोक्यात जाड वस्तूने वार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अक्रम कुरेशी घरी न आल्यामुळे त्याच्या भावाने मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गायब झाल्याची तक्रार दिली होती. तपासामध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले, ज्या आधारावर पोलिसांनी २० वर्षांच्या महिलेला अटक केली आहे.
अक्रम कुरेशी याची हत्या नेमकी कशामुळे झाली? या हत्येचा उद्देश दरोडा की जुने वाद? याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्येमागे एकटी महिला आहे का आणखी कुणी? याचाही तपास पोलीस करत आहेत. अन्य संशयितांचा शोधही पोलीस घेत आहेत, पण या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.