राज्यात एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून १५ टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून एसटी तिकीट दरवाढी विरोधात मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाकडून नुकतीच एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनीही या निर्णयावर टीका केली आहे. एसटी महामंडळाला फायदा झाल्याचा दावा करण्यात येतो. मग भाडेवाढ का करता ? असा प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विचारण्यात आला आहे. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यातील विविध एसटी डेपोबाहेर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आंदोलन केलं. एसटी भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
एसटीच्या तिकीट दरात किती टक्क्यांची वाढ ?
एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, परिवहन आयुक्त , अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक यांच्यासोबत प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे तसेच बोरिवलीच्या प्रवासासाठीच्या तिकीट दरात जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्याच्या तिकिटासाठी पूर्वी ५४० रुपये मोजावे लागायचे. ते आता ६२४ रुपये झालं आहे. तर रत्नागिरी ते बोरिवलीच्या तिकिटासाठी ५५० रुपयांऐवजी ६३४ रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्यात कोणत्या ठिकाणी चक्काजाम ?
ठाणे आणि कल्याण
एसटीसोबतच टॅक्सी आणि रिक्षाचंही भाडं वाढवण्यात आलं आहे. त्याविरोधात खोपट बस डेपोमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलं. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण विठ्ठलवाडी बस डेपोच्या गेटवर ठाकरे गटाने आंदोलन केलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत चक्काजाम केला. बस डेपोमधून बाहेर येणारी बस अडवण्यात आली.
सोलापूर आणि कोल्हापूर
सोलापूर एसटी बस स्टँडच्या गेटसमोर ठाकरे गटाने निदर्शने केली. एसटीचे वाढलेले तिकीट दर कमी करावे, यासाठी इथेही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्थानकाबाहेरही आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
बीड
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बीड बस स्थानकाजव चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अमरावती
एसटी महामंडळाने तिकीट दर १५% वाढवल्यानंतर अमरावतीमध्येही ठाकरे गटाने आंदोलन केलं. अमरावती सेंट्रल बस स्थानकासमोर ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन सुरु आहे. एकही बस बसस्थानकाबाहेर जाऊ देणार नाही, असं इथल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.