अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचारासाठी विद्यार्थ्याने दिली चक्क १०० रुपयांची सुपारी, हत्येची योजना; तिघांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्याच्या दौंड शहरात एक नामांकीत इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतच सुपारी देणारा तो विद्यार्थी. सुपारी घेणारा विद्यार्थी. आणि ज्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार, हत्या करायची होती ती विद्यार्थीनी हे सर्वजण याच शाळेत शिकतात. सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. हीबाब संबधीत विद्यार्थीनीने शिक्षकांना सांगितली. त्याचा राग या विद्यार्थ्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने एक भयंकर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या मुलीच्या बलात्कार आणि खूनाची सुपारी देण्याचे ठरवले. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.
मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले.यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.