पंतप्रधान मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर, मोदींच्या स्वागतासाठी कुलाबा परिसरातील फेरीवाले आणि स्पीड ब्रेकर हटवले
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे १५ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. दरम्यान ,मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहेत. पदपथ आणि रस्त्यावरून स्पीड ब्रेकर हटवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी येण्याची शक्यता आहे आणि ते याच मार्गाने जाणार आहेत. नेहमीच गर्दी असलेल्या भागात आज मात्र शांतता पाहायला मिळत आहे. दरम्यान,गेल्या अनेक वर्षांपासून कुलाबा कॉजवेवरील फेरीवाल्यांची वाढती संख्या स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनली होती. आज मोकळे रस्ते पाहुन कुलाबा येथील नागरिकांना आनंद झाला असेल. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदलाच्या तीन लढाऊ युद्धनौका नौदल डॉकयार्डमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला भेट देणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.