अमरावती येथील गोल्डन फायबर कंपनीतील पाणी प्यायल्याने १०० हून अधिक महिलांना विषबाधा

Spread the love

अमरावती येथील गोल्डन फायबर कंपनीतील पाणी प्यायल्याने १०० हून अधिक महिलांना विषबाधा

योगेश पांडे/वार्ताहर 

अमरावती – अमरावती जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १०० पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या गोल्डन फायबर कंपनीमध्ये ७०० पेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत. आज १२ जानेवारी रोजी, रविवारी सकाळपासून गोल्डन फायबर कंपनीमधील काही महिलांना अचानक मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. दुपारनंतर यातील १०० पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

गोल्डन फायबर कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्रास होत असलेल्या संबंधित महिला या सकाळी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाल्या. त्यानंतर कंपनीमध्ये आल्यानंतर त्या पाणी प्यायल्या. पाणी पियाल्यानंतर काही महिलांना मळमळ जाणवू लागली. मात्र वातावरणातील फरक किंवा किरकोळ काही असावं असं समजून महिलांनी त्यांना होणाऱ्या मळमळ आणि डोकेदुखी या समस्यांकडे दुर्लक्ष केलं.

मात्र एकामागे एक अनेक महिलांना हीच समस्या जाणवू लागली. अनेक महिला मळमळ आणि डोकेदुखीने त्रस्त झाल्या. एकाच वेळी तब्बल १०० हून अधिक महिलांना हीच समस्या जाणवू लागल्याने कंपनीतून गंभीर दखल घेण्यात आली. तात्काळ १०० हून अधिक महिलांना अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही सैनिकांनी महिलांना रुग्णालयात देण्यासाठी धावपळ केली. सध्या त्रास होत असलेल्या महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा असून नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon