रॅकेट ! सांगलीच्या दोन वर्षीय मुलीची साडेचार लाखांत गोव्यात विक्री; सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
सांगली – राज्यात मुली व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार तर होतच आहेत, पण आता अल्पवयीन मुलींची विक्री सुद्धा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कवठेमहांकाळ येथील एका दोन वर्षांच्या चिमुरडीची केवळ साडेचार लाखांना गोव्यात विक्री केल्याची घटना सांगलीमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तेल वस्तीत राहणाऱ्या राजेंद्र मेस्त्री व शिल्पा मेस्त्री, स्मिता ज्ञानेश वाडीकर (गोवा), वंदना सुर्वे (बेळगाव), रवी राऊत आणि राणी राऊत अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुले विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाशही केला आहे. लहान मुलीला बालसुधारगृहात ठेवता यावे यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीच्या वडिलांना केवळ साडेचार लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी तिची साडेचार लाखांत गोव्यात विक्री केली. त्यानंतर बेळगाव येथील एका हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून संबंधित आरोपींना अटक करून मुलीला ताब्यात घेतले. आरोपींनीही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची बेळगाव येथील साहाय्यवाणी केंद्राने दखल घेतली असून या मुलीची खरेदी केलेल्या गोव्यातील स्मिता वाडीकर हिला १७ जानेवारी समितीपुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींची सध्या चौकशी सुरू असून यातून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी आरोपींनी कुणाला अशाच प्रकारे बाळ किंवा मुलांची विक्री केली का? याचाही आता पोलिस कसून तपास करत आहेत. यातून मोठे रॅकेटही समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलींची विक्री होत असल्याने सांगलीत खळबळ माजली आहे.