कल्याण, डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांत विविध प्रकारच्या चोऱ्यांचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

Spread the love

कल्याण, डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांत विविध प्रकारच्या चोऱ्यांचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांत विविध प्रकारच्या चोऱ्यांचा माध्यमातून नागरिकांचा किमती ऐवज चोरीस गेला होता. यामधील बहुतांशी चोऱ्यांचा तपास करून पोलिसांनी चोरीचा ऐवज चोरट्यांकडून हस्तगत केला. हा सर्व एक कोटी ४३ लाखाचा ऐवज बुधवारी येथील एका कार्यक्रमात तक्रारदार १६२ नागरिकांना परत करण्यात आला. कल्याण येथील बाजार समितीजवळील साई नंद सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे उपस्थित होते. ठाणे शहर पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून नागरिक आणि स्थानिक पोलिसांमधील संवाद वाढावा, नागरिकांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती दूर व्हावी यासाठी नागरिक-पोलीस समन्वय कार्यक्रमांचे विविध पोलीस ठाणे हद्दीत कार्यक्रम केले जात आहेत. चोरी झाली की गेलेला ऐवज परत मिळत नाही, असा एक नागरिकांचा गैरसमज असतो. परंतु, नागरिकांना चोरीस गेलेला ऐवज परतही मिळू शकतो. पोलीस त्यादृष्टीने तपास करत असतात, हे समजावे यासाठी कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या संकल्पनेतून मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कल्याण, डोंबिवलीतील विविध पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार नागरिक हजर होते. चोरी झालेली ४९ लाख ७१ हजार रूपयांची ३० वाहने नागरिकांना परत करण्यात आली. यामध्ये दुचाकी, रिक्षा, मोटारी यांचा समावेश होता. ९५ लाखाचे ९१ महागडे मोबाईल फोन, ६४ लाखाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, १२ लाख रूपयांची रोख रक्कम असा एकूण एक कोटी ४३ लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज कल्याण-डोंबिवली पोलीस दलातर्फे नागरिकांना परत करण्यात आला.

चोरीस गेलेला माल आहे त्या स्थितीत परत मिळाल्याने उपस्थित तक्रारदार नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी आपल्या भावना व्यासपीठावर व्यक्त केल्या. पोलीस आणि नागरिकांनी समन्वयाने काम केले तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविषयी कोणतीही भीती न बाळगता आपल्या घर परिसरात काही गैरकृत्य, अन्य काही घटना घडत असेल तर त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन उपायुक्त झेंडे यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon