नागपुरनंतर मुंबई हादरली; आत्महत्या की घातपात?
नवी मुंबईच्या कामोठ्यामध्ये बंद खोलीत आई अन् मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.
योगेश पांडे/वार्ताहर
नवी मुंबई – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अशातच आता मुंबईच्या कामोठ्यामध्ये बंद खोलीत आई अन् मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई परिसरातील कामोठे येथील सेक्टर ६ मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळला आहे. या दोघांचीही हत्या झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. नवी मुंबईतील कामोठे परिसरातील ड्रीम हौसिंग सोसायटी मधील फ्लॅट क्रमांक १०४ चा दरवाजा आतून बंद असून घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत अशी माहिती सव्वा चार वाजता कामोठे पोलीस ठाणे येथे मिळाली.
माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दरवाजा बाहेरून उघडून घराची पाहणी केली असता गीता भूषण जग्गी (७०) त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (४५) माय लेक मृत अवस्थेत आढळून आले. एका घरात आई आणि मुलाची बॅाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत गीता यांचा मुलगा जितेंद्र याच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एलपिजी गॅस लिक असल्याचे आढळले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आल्या असून हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु करण्यात येत आहे. सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरवात करण्यात आली आहे. घटना स्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास चालू आहे. या प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलीस करीत आहेत