ट्राफिक जाममधून वाहन चालकांसाठी रस्त्यावर उतरले खासदार बाळ्या मामा; टोलवाल्यांना धरले धारेवर
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर पडघा येथे असलेल्या टोलनाक्यावर कंपनीच्या टोल वसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनाही बसला. त्यामुळे बाळ्या मामांनी रस्त्यावर उतरुन टोल प्रशासनाला धारेवर धरलं. भिवंडीतील वाहतूक कोंडी स्थानिकांसाठी नवीन नाही. मुंबई नाशिक महामार्गावर पडघा येथे असलेल्या टोलनाक्यावर रविवारी रात्री वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ट्राफिक जाममधून वाहन चालकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा म्हात्रे पुन्हा रस्त्यावर उतरले. टोल प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली.
खासदार बाळ्या मामा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या कामाची अनेकांनी तारीफ केली आहे. याआधी देखील भिवंडीतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा अनेकदा रस्त्यावर उतरले आहेत.