कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

Spread the love

कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण तालुक्यातील रायते येथील एका जमीन खरेदी प्रकरणात जमीन मालक शेतकऱ्याकडून ४० हजार रूपयांची लाच घेताना येथील तहसीलदार कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संतोष महादेव पाटील (४६) असे लाच घेताना पकडलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, संजय गोवीलकर, पोलीस निरीक्षक रूपाली पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक रूपाली पोळ यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी यांनी कल्याण तालुक्यातील रायते गावी दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सातबारा उतारा आणि फेरफार स्वताच्या नावे नोंद होण्यासाठी तक्रारदार शेतकरी महसूल कार्यालयात प्रयत्नशील होता. सातबारा, फेरफार नोंद होण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदीदार शेतकऱ्याकडे शेतकरी असल्याचा तहसीलदारांचा दाखला आवश्यक होता. त्याशिवाय ही नोंद होणार नाही असे खरेदीदाराला महसूल विभागाने कळविले होते. खरेदीदार शेतकऱ्याने या दाखल्यासाठी आपल्या मूळ गावी असलेल्या उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तहसीलदारांचा दाखला मिळण्याची मागणी त्या कार्यालयाकडे केली होती. त्याप्रमाणे तो दाखल कल्याण तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. जमीन खरेदीदार शेतकऱ्याची शेतकरी दाखल्यासह सातबारा सदरी नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, असा प्रस्ताव रायते तलाठी यांना पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील महसूल साहाय्यक संतोष पाटील यांनी तक्रारदाराकडे चाळीस हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आपल्याकडे पैसे मागितले जात असल्याने जमीन खरेदीदार शेतकऱ्याने याप्रकरणी गेल्या शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली.

सदर तक्रारीप्रमाणे मंगळवारी तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत महसूल सहाय्यक स्वतासाठी २० हजार आणि वरिष्ठांसाठी २० हजार रूपये मागत असल्याचे निष्पन्न झाले.बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्याने महसूल सहाय्यक पाटील यांना लाचेची रक्कम देण्याचे कबुल केले. कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक कक्षाच्या पाठीमागील बाजूस तक्रारदार शेतकऱ्याकडून ४० हजार रूपयांची लाच घेताना पथकाने संतोष पाटील यांना रंगेहाथ पकडले. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल सहाय्यक पाटील यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon