मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाकडून अविनाश जाधवांवर आरोप

Spread the love

मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाकडून अविनाश जाधवांवर आरोप

योगेश पांडे/वार्ताहर 

पालघर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही, निवडणूकीत त्यांचा दारुण पराभव झाला. एकीकडे पक्षाकडून पराभवाची कारणं शोधली जात असताना दुसरीकडे अंतर्गत वाद समोर येत आहे. पालघरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबाकडून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर आरोप केले असून, अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची चर्चा रंगली आहे.

पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा भाऊ अतिश मोरे याच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिश मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बोईसरमधील मनसेच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. समीर मोरे, अतिश मोरे काही जणांसह कार्यालयाच्या बाहेर बसले होते. याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. समीर मोरे यांनाही यावेळी मारहाण झाली आहे. अतिश मोरे यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल होऊन घटनेची माहीती घेतली, दरम्यान हल्ला केल्यानंतर सर्वजण गाडीतून पसार झाले. त्यामुळे पोलिसांच्या हाती कोणी लागलेलं नाही. दरम्यान मोरे कुटुंबाने अविनाश जाधव यांनी हल्ला केल्याचा आरोप केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon