मनी लॉड्रिंगचा धाक दाखवून शिक्षकाला केले ‘डिजिटल अरेस्ट’
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – राज्यात ठिकठिकाणी सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सायबर चोरटे नवनवीन क्लुप्त्या लढवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करीत आहेत. असाच प्रकार अमरावती परिसरात घडला आहे. मनी लाँड्रिंगचा नावाखाली ४५ वर्षीय शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तुम्हाला व कुटुंबीयांना खरोखरीच अटक करू, अशी भीती दाखवण्यात आली. या गुन्ह्यातून सुटण्यासाठी शिक्षकाला पाच लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांत तब्बल महिन्यानंतर गुन्हा नोंद केला आहे.
अमरावती येथील रहमतनगर परिसरातील ४५ वर्षीय शिक्षकाला ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास एक व्हिडिओ कॉल आला. पलीकडून राजकुमार व हेमराज कोळी बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ९८०१२९४८९५ या क्रमांकाहून आलेल्या कॉलवरून त्या व्यक्तींनी आपण टेलिकॉम व क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगितले. बँक खात्याच्या तपशिलानुसार आपण मनी लाँड्रिंग केली आहे. त्यात आरोपी म्हणून नाव आले असून तोतया क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने त्या शिक्षकाला अटकेची व गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली. दोन ते तीन तास फोनवरूनच हा प्रकार चालला. शिक्षक पूर्णपणे घाबरल्याचे लक्षात येताच गुन्ह्य काढण्यासाठी सायबर भामट्याने पैशांची मागणी केली. ती रक्कम बंधन बँकेतील मल्टिप्लाय इंटरप्राइजेस फिशिंग बिजनेस या दोन बँक खात्यामध्ये पाठविण्यास सांगितले. त्यातून आरोपींनी आपली ४ लाख ९९ हजार ९७१ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचे त्या शिक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले.
कोट
“फसवणुकीच्या या प्रकारात घोटाळेबाज ईडी, सीबीआय, पोलिस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. मग सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात. अशा प्रकाराला बळी पडू नका. कोणत्याही अज्ञात स्रोताकडून येणाऱ्या लिंकवर क्लिक करणे टाळा, कोणत्याही अनोळखी फोन कॉलवर तुमचे वैयक्तिक किंवा बँक तपशील देण्याची चूक करू नका”.
– नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त