नाशकात २० हजारांची लाच घेताना तालुका वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – सरकार नियमितपणे पगार देऊन देखील काही शासकीय कर्मचारी प्रलोभनाला बळी पडून आपल्या आयुष्यात पत घालवून बसतात. अशीच एक घटना घडली आहे. २० हजारांची लाच घेताना दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सुभाष हरीभाउ मांडगे (वय ४४, तालुका वैद्यकीय अधिकारी, वर्ग-१, दिंडोरी पंचायत समिती, दिंडोरी जि. नाशिक) रा. प्लॅट नं. २, श्री शक्ती अपार्टमेंट, कलानगर, म्हसरुळ ता. जि. नाशिक, असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे सरकारी आयुर्वेद दवाखाना, कोशींबे ता. दिंडोरी येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दवाखान्यास सन २०२०-
२०२१ ते २०२३-२०२४ पर्यंत शासनाकडुन प्राप्त अनुदान म्हणुन विवीध कामासाठी आलेला २,२७,००० असा निधी दवाखान्याच्या विविध कामासाठी वापरण्यात आला. सदर खर्चाबाबतचे लेखा परिक्षण झाले आहे. तरी देखील आरोपी मांडगे यांनी तक्रादार यांचेकडे नमूद कालावधीत शासनाकडून प्राप्त २,२७,००० रुपये निधीवर कमीशन म्हणुन काही रक्कम लाचेची मागणी केली.
तक्रादार यांना मांडगे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक २८/१०/२०२४ रोजी पडताळणी दरम्यान दिंडोरी पंचायत समिती येथील मांडगे यांचे कार्यालयात पंच साक्षीदार यांचे समक्ष मांडगे यांनी तक्रारदार यांचेकडे सरकारी आयुर्वेद दवाखाना, कोषींबे ता. दिंडोरी या दवाखान्यास सन २०२०-२०२१ ते २०२३-२०२४ पर्यंत शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणुन विविध कामासाठी आलेला २,२७,००० रुपये निधीच्या प्रथम १० टक्के रक्कम मागणी करुन, नंतर लाच म्हणुन २० हजार रुपये रक्कमेची लाचची मागणी केली. सदरची लाच रक्कम काल कलानगर, म्हसरुळ ता. जि. नाशिक येथे पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता, रंगे हाथ पकडण्यात आले. मांडगे यांचे विरुध्द म्हसरुळ पोलीस स्टेषन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी केली.