वर्ध्यात शरद पवार गटाच्या नितेश कराळे मास्तरांना कानफटवले
पोलीस महानगर नेटवर्क
वर्धा – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना दि.२० नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यानंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
याबाबत कराळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “मी माझ्या गावावरून मतदान करून येत होतो. तेव्हा वर्धा मतदारसंघात मी निघालो होतो, यावेळी माझ्याबरोबर माझं कुटुंबही होतं. उमरी या गावात जाण्यायेण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी मी थांबून लोकांची विचारपूस केली. यावेळी पोलिसांनी सांगितलं की तुमच्या बुथवर दोन लोक ठेवा तसेच समोर आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. या बूथवर आठ लोक बसून होते. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी देखील बसून होते. एवढंच नाही तर ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसून होते. त्यासाठी पोलिसांना फोन केला आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी पुढे गेलो असता भाजपाच्या उमरीमधील एक कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामध्ये माझ्या लहान मुलीलाही लागलं”, असा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे.