दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद; २ गावठी पिस्तुल अन् काडतुसे जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – गुन्हेगारीतील क्रेझ तसेच परिसरात दहशत पसरविण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या मित्राला थरारकरित्या सापळा लावून जेरबंद करण्यात आले. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. रितेश बाबासाहेब कसबे (१८) तसेच राहुल संजय चौधरी (२१) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग तसेच गस्त घातली जात आहे. तर पाहिजे व फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, एका रुग्णालयाच्या पाठिमागील बाजूस सराईत गुन्हेगार रितेश व त्याचा मित्र राहुल चौधरी हे दोघे काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असून, त्यांच्याजवळ घातक शस्त्र आहेत. त्यानूसार, पथकाने या परिसरात सापळा लावला. मात्र, चाहूल लागताच दोघेही घाबरले. पथकाने त्यांना पकडले आणि त्यांची झडती घेतली. तेव्हा रितेश आणि राहुल याच्या झडतीत एक-एक गावठी पिस्तुल मिळाले. तसेच, ४ काडतुसे मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही पिस्तुल हे दहशत बसविण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रितेश कसबे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती काळेपडळ पोलिसांनी दिली.