यात्रेला गेलेल्या माथेरानच्या युवकांवर काळाचा घाला, दोघांची अंत्ययात्रा, तिसरा गंभीर जखमी

Spread the love

यात्रेला गेलेल्या माथेरानच्या युवकांवर काळाचा घाला, दोघांची अंत्ययात्रा, तिसरा गंभीर जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

माथेरान – साजगाव यात्रेसाठी माथेरानमधून गेलेल्या तीन तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. त्यातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर एकजण जबर जखमी आहे. दोन तरुणांच्या मृत्युमुळे संपूर्ण माथेरानवर शोककळा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून मंगळवारी माथेरानमध्ये बंद पाळण्यात आला. कार्तिकी एकादशीपासून खालापूर तालुक्यातील साजगाव यात्रेला सुरुवात झाली आहे. बोंबल्या विठोबाचे दर्शन आणि यात्रा असा दुहेरी आनंद घ्यायला भाविकांची गर्दी होत आहे. सोमवारी रात्री माथेरानमधून सहा तरुण दोन दुचाकी घेऊन यात्रेला आले होते. साजगाव यात्रेवरून ते पुन्हा माथेरानला परतत असताना त्यांचा महड फाट्याच्या पुढे समोरील उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की अजय आखाडे (१८) आणि दर्शन वेताळ (१६) यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश सोनवणे (१७) हा युवक जबर जखमी झाला आहे. तिन्ही जखमी युवकांना तात्काळ कळंबोलीममधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दर्शन वेताळ याचा जागेवरच मृत्यू झाला तर पहाटेच्या सुमारास अजय आखाडे याने शेवटचा श्वास घेतला. अडीच वर्षांपूर्वी अजय आखाडेच्या वडिलांचे निधन झाले होते. या दुर्घटनेमुळे माथेरानमध्ये शोककळा पसरली आहे. या दोन्ही युवकांना श्रद्धांजली म्हणून मंगळवारी व्यापारी मंडळाने दुकाने बंद ठेवली होती तर अश्वपाल संघटनेकडून घोडे देखील बंद ठेवले होते. संध्याकाळी सहा वाजता माथेरानमधील वैकुंठ धाम येथे दोघांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माथेरानकरांना अश्रूंना बांध घालणे अवघड जात असल्याचे दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon