नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा
नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली; एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचारचा सोमवारी अखेरचा दिवस असल्याने निवडणूक आयोगाचे पथक अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी मुंबईत ८० कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. या पाठोपाठ नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आले. नागपुरात जप्त केलेल्या सोन्या चांदीची किंमत १४ कोटी तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत पाच कोटी ५९ लाख ६१ रुपये आहे.
आता या पाठोपाठ नाशिकमध्ये मोठं घबाड सापडलं आहे. नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळत असून या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इतकी मोठी रक्कम आढळल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कोट्यवधींची रक्कम सत्ताधारी पक्षाची असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आता यावर काय कारवाई होणार आणि ही रक्कम नेमकी कोणाची आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.