निवडणूक अधिकाऱ्याचा बनाव करत व्यावसायिकाला २५ लाखांचा गंडा; लुटारु टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
कोल्हापुर – कोल्हापुरातील तावडे हॉटेलच्या जवळ निवडणूक दक्षता अधिकारी भासवून एका व्यावसायिकाला तब्बल २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीवर गांधीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, यांना पहाटे ५.१५ वाजता ५ लोकांच्या टोळीने “निवडणूक दक्षता अधिकारी आहोत, सध्या आचार संहिता सुरु असून तुम्ही रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही,” असे सांगुन फिर्यादीस गाडीमध्ये बसवून करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडील २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट काढून घेण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सुचना तपासणी टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ६ तपास पथके नेमून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या गुन्हानंतर हे आरोपी गोवा येथे गेले होते याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव आणि त्यांचे पथक गोवा तात्काळ येथे रवाना झाले. दरम्यान आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चेतन मसुटगे व पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी संजय महावीर किरणगे (४२), अभिषेक शशिकांत लगारे (२४) आणि विजय तुकाराम खांडेकर (२८) या आरोपींना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले गेले. हे आरोपी कोल्हापुरातील आहेत. आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारणा केल्यास त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी २ आरोपी असून त्यांची नावे स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात असून ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगीतले.
तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA-३३-Z-५५५० किंमत २० लाख रुपये व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH-०९-GA-६२५९ किंमत १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाण्यास जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत.