ड्रग्जविक्री करणाऱ्या युवकाला शांतीनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भिवंडी-कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या साई प्रेम ढाब्यासमोर सोमवारी रात्री ८.१५ च्या सुमारास एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. साहिल सईद शेख असे आरोपीचे नाव आहे. शांतीनगर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीचे २१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे, त्यामुळे अशा कारवायांविरोधात पोलिस कडक कारवाई करत आहेत.