अभिनेता सलमान खानला २ कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; थेट मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – सलमान खानच्या आयुष्यातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहे. दबंग खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आली आहे पैसे दिले नाही तर अभिनेता मारला जाईला अशा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. या धमकीच्या मेसेजविरोधात मुंबईतील वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात तपास सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरळी वाहतूक पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दोन धमकीचे संदेश पाठवले आहेत. वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (२), ३०८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळा घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती. त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, जो सलमान खानला मदत करेल त्याची हीच व्यवस्था होईल, असा इशारा या गँगने दिला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत बाबा सिद्दीकीचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकीचा कॉल आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी नोएडा इथून एका २० वर्षीय व्यक्तीला अटक केलीय. मोहम्मद तय्यब, गुरफान खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला नोएडाच्या सेक्टर ३९ मध्ये अटक करण्यात आली. जीवे मारण्याच्या धमक्या देण्यासोबतच आरोपी मोहम्मद तय्यब उर्फ गुरफान याने झीशान सिद्दिकी आणि सलमान खान यांच्याकडेही पैशांची मागणी केली होती.