विधानसभेचे तिकीट देतो सांगून नाशिकच्या आमदाराकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – आरोपी अनेक क्लुप्त्या वापरून फसवणूक करण्याचे तंत्र आत्मसात करीत असले तरी कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच. अशीच एक घटना नाशिक परिसरात घडली आहे. नाशिक शहरातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडे विधानसभेचे तिकीट देतो, त्यासाठी ५० लाख रुपये लागतील, असे सांगून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट -१ च्या पथकाने नवी दिल्ली येथून अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले, की नाशिक शहरातील एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे मी पंतप्रधान कार्यालयाचा प्रिन्सिपल सेक्रेटरी असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईलवर फोन करून विधानसभेचे तिकीट पाहिजे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून पैशाची मागणी केली होती. याबाबत दि. ६ ऑक्टोबर रोजी संबंधित लोकप्रतिनिधीने सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक १ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व इतर माहितीच्या आधारे दिल्लीत हे आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करून आरोपी सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा (रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश) आणि गौरवनाथ (रा. नवी दिल्ली) हे संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींना दिल्लीच्या स्पेशल विभागाने एका प्रकरणामध्ये अटक केली होती. त्यामुळे नाशिक पोलिसांचे काम सोपे झाले. त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना नाशिक येथे आणून न्यायालयात उभे केले असता, त्यांना नाशिकच्या न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, शरद सोनवणे व जगेश्वर बोरसे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली.