कल्याणमध्ये नोकरीच्या नावावर तरुणीला १० लाखांचा चुना, टास्कच्या नावाखाली पैशांची मागणी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – राज्यात बेरोजगार तरुण- तरुणींना नोकरीच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. अशीच एक घटना कल्याण व ठाणे परिसरातून समोर आली आहे. अर्ध वेळ नोकरीच्या नावाखाली मुलीची १० लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नगर संकुलात राहणाऱ्या एका तरुणीशी ४ जणांनी ऑनलाइन टेलिग्रामद्वारे संपर्क साधून अर्धवेळ नोकरीची माहिती दिली. यानंतर मुलीला सांगण्यात आले की, तिला काम दिले जाईल आणि इतर लोक तिच्याशी संपर्क साधतील. नोंदणीचे काम करावे लागेल, असे त्या तरुणीला सांगितले. यासाठी तुम्हाला कामे दिली जातील, ती तुम्हाला पूर्ण करावी लागतील. हे काम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही जे काही पैसे द्याल, त्या बदल्यात तुम्हाला वाढीव रक्कम दिली जाईल. असे खोटे आश्वासन मुलीला देण्यात आले. यानंतर आरोपीने मुलीकडून वेळोवेळी १० लाख ५१ हजार रुपये घेतले. नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलीने नोकरीची मागणी केली आणि आरोपींकडून दिलेली रक्कम मागितली असता, विविध कारणे सांगून आरोपीने तरुणीला एक वर्षापासून लांबवल्याची व उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे परत मिळत नसल्याने आणि नोकरीही मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे मुलीच्या लक्षात आले. यानंतर तरुणीने प्रिया, दिशा, अदिती आणि नारायण पटेल या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.