प्रचंड पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफनविधी

Spread the love

प्रचंड पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफनविधी

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एक आठवड्यापूर्वी एन्काऊंटर झाला. मात्र त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नव्हती. अखेर त्याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय शिंदेचा उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला आहे. अक्षय शिंदेच्या शवावर बदलापूर शहरात अंत्यसंस्कार करण्यास नागरिकांचा विरोध होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अंबरनाथ पालिकेत जाऊन दफनविधीसाठी जागा देण्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलं होतं.अखेर रविवारी पोलिसांच्या सुरक्षेत उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफनविधी पार पडला. राज्य सरकारनं अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाला दिलेली होती.शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खणण्यात आला होता. इथेच अक्षयचा मृतदेह दफन केला गेला.

अक्षय शिंदे याने बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. तसेच आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पुढे जाऊन पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले होते. आरोपी अक्षय शिंदेने आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली होती. अशातच सोमवारी २३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. कळवा तुरुंगातून नेण्यात येत असताना त्यानं पोलीस वाहनात गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचून त्यानं गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षयचा मृत्यू झाला, असा घटनाक्रम सांगण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमावर, त्यांच्या दाव्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच विरोधकांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान,या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीआयडीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील तपासाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon