अंधेरीत नराधम पित्याकडून दोन मुलींवर लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – अंधेरीच्या वर्सोवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नराधम पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली वर्सोवा पोलिासांनी ५२ वर्षीय पित्याविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनाथाश्रमात राहत असलेल्या मुलीने नुकतीच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पीडित मुलगी ही १८ वर्षांची असून २०११ ते २०१६ या कालावधीत ती अल्पवयीन असताना आरोपी पित्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. पीडित मुलीची व तिच्या आईशी नुकतीच भेटल झाली असता आरोपी पित्याने तिच्या १४ वर्षांच्या लहान बहिणीवरही अत्याचार केल्याचे समजले. त्यामुळे पीडित मुलीने एवढ्या वर्षानंतर धाडस करून स्वयंसेवी संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीशी भांडण झाले असताना आरोपी पित्याने तिच्यावर अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे. नराधम पित्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७६२(जे), ३७६(२)(एन), ३७(२)(फ) सह पोक्सो कायदा कलम १०,१२,४, ६, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.