लोकल प्रवासा दरम्यान विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून महिलेला परत

Spread the love

लोकल प्रवासा दरम्यान विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून महिलेला परत

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – लोकल प्रवासात विसरलेले दिवा-आगासन येथील एका महिलेचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या महिलेला परत केले. दागिने असलेल्या पिशवीवर एका सराफाच्या दुकानाचे नाव होते. पोलिसांनी त्या दुकानात जाऊन त्या महिलेचा पत्ता, मोबाईल क्रमांक काढून, दिव्यातील त्या महिलेचा पत्ता शोधून तिला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून तिला ते दागिने परत केले. रेल्वे प्रवासातील एका महिलेच्या तत्परतेमुळे हे सोन्याचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून दागिने हरवलेल्या महिलेला परत मिळाले. शनिवारी रुपाली खराडे या मुंबईतून कल्याणच्या दिशेने लोकलने प्रवास करत होत्या. लोकलमधील ज्या आसनावर त्या बसल्या होत्या, त्याच्या बाजुला एक लहान पिशवी होती. तेथे कोणीही प्रवासी नव्हता. त्यामुळे कोणी प्रवासी ती पिशवी विसरून गेला असेल, असे रुपाली यांना वाटले. त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून ती पिशवी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पवार, हवालदार सचिन हेंबाडे, कविता बांगर, रुपाली दराडे यांनी सोन्याचा ऐवज असलेली पिशवी उघडली. त्या पिशवीत चार सोन्याच्या अंगठ्या, कानातील जोडे, बिंदी, ब्रेसलेट, सोनसाखळी असा तीन लाखाचा सोन्याचा ऐवज होता. ऐवज असलेल्या पिशवीवर कुशलाबाई ज्वेलर्स नाव लिहिले होते. गणपती सणानिमित्त ही खरेदी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. दागिने हरवलेल्या महिलेचा शोध घेणे अवघड होते. पोलिसांनी कुशलाबाई ज्वेलर्सचा पत्ता शोधून काढला. तेथून त्या महिलेची माहिती काढली. ती महिला दिवा-आगासन येथील सुषमा किरण हासे (३४) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुषमा यांना संपर्क करून त्यांना डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलविले. प्रवासी महिला रुपाली खराडे यांनाही बोलविण्यात आले.वरिष्ठ निरीक्षक उंदरे यांनी उपस्थित पोलिसांच्या समक्ष सुषमा यांना त्यांचे दागिने परत केले. याबद्दल सुषमा यांनी रूपाली खराडे यांच्यासह लोहमार्ग पोलिसांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon