उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Spread the love

उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

महिला लिपिकाशी लगट करून शारीरिक सुखाची मागणी; मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पालिकेत खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

उल्हासनगर – महिला लिपिकाशी लगट करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात विनयभंगाचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. जमीर अकबर लेंगरेकर (४६) असे गुन्हा दाखल झालेल्या अतिरिक्त आयुक्तांचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे पती उल्हासनगर महापालिकेत चालक पदावर कार्यरत असताना त्यांचे २०१० साली आजारपणामुळं निधन झाले. त्यानंतर पतीच्या जागेवर २०११ साली पीडित महिला कनिष्ठ लिपिक म्हणून महापालिकेत रुजू झाल्या होत्या. त्यातच २०२२ साली मालमत्ता विभागात कार्यरत असताना या विभागाचा कार्यभार लेंगरेकर यांच्याकडे असल्याने त्यांच्या दालनात कामानिमित्ताने जाणे येणे होते. याचाच फायदा घेऊन पीडित महिलेशी अश्लील चाळे करत वारंवार शारीरिक सुखाची मागणी करीत होते.

खळबळजनक बाब म्हणजे पीडित विधवा महिलेसोबत एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत असे प्रकार घडत असल्याने अखेर पीडित विधवा लिपिकेने २० मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेत जमीर अकबर लेंगरेकर यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला. या तक्रारीनंतर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार १४ ऑगस्ट २०२३ रोजी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने विशाखा समिती स्थापन करून या तक्रारीची चौकशी सुरू केली होती. या चौकशीतील अहवाल महापालिका आयुक्तांकडे ५ सप्टेंबर २०२३ रोजी सादर केला. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडे सामान्य प्रशासनाचा कार्यभार असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक पीडित लिपिक महिलेला गेल्या सहा महिन्यांपासून नाहक त्रास देऊन मानसिक त्रास देत असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पीडितेने नमूद केलं आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त जमीर अकबर लेंगरेकर हे देत असलेल्या त्रासाला व शारीरिक सुखाच्या मागणीविरोधात पीडित लिपिक विधवा महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी धाव घेत लेंगरेकर विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (ए) ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांची संपर्क साधला असता पीडित महिला ही महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत असून त्यांच्या तक्रारीवरून अतिरिक्त आयुक्त जमीर अकबर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक अधिक तपास करीत असल्याचे सांगितले.

दरम्यान या गुन्ह्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, पालिका हद्दीतील होर्डिंग घोटाळा काढला असून बेकायदा होर्डिंग ठेकेदारांवर उल्हासनगर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणात आले. तसेच हा घोटाळा बाहेर पडू नये म्हणून माझ्यावर आधी दबाव आणला. विशेष म्हणजे पोलिसांकडून होर्डिंग घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच, माझ्या विरोधात कट कारस्थान रचून त्या लिपिक महिलेशी होर्डिंग ठेकेदाराने संगनमत करून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या लिपिक महिलेने माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांनी फेटाळून लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon