ठाकरेंच्या आमदाराची सिनेस्टाईल सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड; वैभव नाईकांचा संताप, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मालवण – राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात तोडफोड केली होती. या प्रकरणी काल रात्री उशिरा आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कोसळला या या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार काल रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंते हे अधिक तपास करीत आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले
मनोज जरांगे पाटील यांनी देखील या घटनेनवरुन सरकारवर टीका केलीये. ते म्हणाले की, ‘दैवत देखील कळत नाही. त्यांच्या पुतळ्याच्या देखील भ्रष्टाचार केलाय. यात मोदींनी उद्घाटन केले म्हणून त्यांचा दोष नाही. महापुरुषांच्या पुतळ्याच काम असं व्हायला नको. यांना कायमची अद्दल घडवायला हवी. हे स्मारक बांधणाऱ्यांना जेलमध्ये टाका. मोदी साहेबांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उदघाटन केलेलं आहे. ते स्मारक व्हायला हवं.’
संभाजीराजे यांची प्रतिक्रिया
डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट – सिंधुदुर्ग येथे उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आज कोसळले. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.”