पुण्यात महिला पोलिसाचा मित्राला फोन, इंद्रायणी नदीत उडी घेत आयुष्य संपवलं
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने या महिला पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने इंद्रायणी नदी पात्र उसंडून वाहत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. अनुष्का सुहास केदार (२०) असं आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचं नाव आहे. पोलिसांनी बचाव पथकाकडून त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साधारण सव्वापाच वाजेच्या सुमारास अनुष्का या इंद्रायणी नदीवर आल्या होत्या. दोन दिवसांपासून त्या कर्तव्यावर देखील गेलेले नव्हत्या. साधारण साडेतीन-चार वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरातून इंद्रायणी येथील पुलावर आल्या. त्या पुलावरूनच त्यांनी आपल्या मित्राला फोन केला. ”मी आत्महत्या करत आहे”, असं सांगून त्यांनी इंद्रायणी नदी पात्रात थेट उडी घेतली. हा सर्व प्रकार एका तरुणाने पाहिला. त्यानंतर त्याने या महिला पोलिसाला इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यात त्याला यश आले नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू केला आहे. वैयक्तिक कारणामुळे ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.