नाशिकमध्ये चिमुरड्याचे अपहरण करून निर्घृण हत्या, चांदवड परिसरात एकच खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – पुणे, नाशिक सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चालले आहे. कायदा- सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न बनत आहे. अलीकडच्या काळात सतत गुन्हेगारीच्या घटना वेगाने वाढत असताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना चांदवडमध्ये घडली आहे. मोलमजूरीसाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. अर्पितकुमार संतोष भगत असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून, तीन दिवसांपुर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. याबाबत वडनेर- भैरव पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, मराठी शाळेच्या मोकळ्या जागेतील झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी याप्रकरणी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने मुलाचा खून केल्याची माहिती दिली. दरम्यान मयत मुलाला आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाने इशारा केल्याचे सीसीटीव्हीमध्ये समोर आले होते. त्याआधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.