टिटवाळ्यात निर्मनुष्य ठिकाणी सापळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा 

Spread the love

टिटवाळ्यात निर्मनुष्य ठिकाणी सापळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा 

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – दादर रेल्वे स्थानकात एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण तालुक्यातील वरप गावात निर्मनुष्य ठिकाणी फेकलेल्या बॅगेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडला. त्याचं वय ६५ ते ७० वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता असून वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका रहिवाशाने ही सुटकेस पाहून स्थानिक कल्याण तालुका पोलिसांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमसमोर बॅग उघडली. यात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑगस्टच्या सकाळीच कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात उघड्या जमिनीवरील कचरापट्टीजवळ लघुशंकेसाठी आलेल्या एका व्यक्तीला निळ्या रंगाची सुटकेस सापडली. त्याने ती उघडून पाहिली तेव्हा त्याला दरदरुन घाम फुटला. त्यात या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण- मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत. घटनास्थळी श्वान पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले आहे. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर असून त्यांनी समांतर तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon