सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू ;२ डॉक्टरांना निलंबित,
नातेवाईकांनी घातला गोंधळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीवर अपघातानंतर वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनिश चौहान (३५) यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वेळीच उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच सर्व कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. सेंट जॉर्ज रुग्णालय घटनेत तातडीने कारवाई करण्यात आली असून २ डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.गुरुवारी दुपारी १२ वाजता विधीमंडळात बैठक झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले.
दरम्यान, घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालय अधिक्षकांना जमावाने मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रुग्णालय अधिक्षकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रुग्णालयात परिस्थिती चिघळली पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे लोकांना आवाहन करत सांगितले की कारवाई केली जात आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ नका.