पूजा खेडकरची आई मनोरमा यांना जामीन; मात्र मुळशी तालुक्यात जाण्यास न्यायालयाची मनाई

Spread the love

पूजा खेडकरची आई मनोरमा यांना जामीन; मात्र मुळशी तालुक्यात जाण्यास न्यायालयाची मनाई

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएसी) उमेदवारी रद्द केलेली प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या खेडकर या येरवडा कारागृहात असून, त्यांना मुळशी तालुक्यात जायचे नाही, या अटीवर जामीन मंजूर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर यांच्यासह अंगरक्षकांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शेतकरी पांडुरंग पासलकर (६५) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनाेरमा खेडकर या पसार झाल्या हाेत्या. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्यांना महाड परिसरातून अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

दिलीप खेडकर यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर मनोरमा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. मनोरमा खेडकर यांनी वकील ॲड. सुधीर शहा यांच्यामार्फत न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. प्रत्यक्ष गोळीबार झालेला नाही. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असून, त्यांनी स्वरक्षणासाठी पिस्तूल वापरले आहे, असा युक्तिवाद ॲड. सुधीर शहा यांनी केला. सरकारी पक्षातर्फे ॲड. कुंडलिक चौरे आणि फिर्यादी पासलकर यांच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह अंबादास खेडकर यांचा काही अटींवर जामीन मंजूर केला. दरम्यान, दिल्लीतील न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पूजाविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिची उमेदवारी रद्द केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon